पिंपरी (Pclive7.com):- भाजपचे माजी नगरसेवक, पक्षाचे शहर सरचिटणीस बाबू नायर यांनी आज (दि.०२) भाजपला सोडचिठ्ठी देत शिर्डीत जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रभारी एच. के.पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
बाबू नायर यांनी आज शहर भाजपच्या सरचिटणीस पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिर्डीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात जात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम, शहर सरचिटणीस सजी वर्की आदी उपस्थित होते.
बाबू नायर हे काँग्रेसकडून ते महापालिकेत स्वीकृत नगरसेवक देखील होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बाबू नायर हे उच्चशिक्षित, शांत, संयमी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या केरळ मधील लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. नायर यांनी भाजप सरचिटणीस पदावर काम केले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर भाजपने नायर यांना स्वीकृत नगरसेवक केले. परंतु, नायर यांनी आज शहर भाजपच्या सरचिटणीस पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.