पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या वस्तु व सेवा कर (जीएसटी) विभागाचे एक पथक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात गेले तीन दिवस तळ ठोकून आहे. पथकातील अधिका-यांकडून टीडीआर खरेदी – विक्री झालेल्या फाईल्सची तपासणी सुरु आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी टीडीआर खरेदी – विक्री व्यवहारात कोट्यावधीच्या जीएसटीची करचुकवेगिरी केली आहे.
नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या व्यवहारांची तपासणी सुरु झाल्याने अधिकारी- बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहेत.महापालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यानुसार आरक्षित जमीन संपादीत करताना महापालिका जमीन मालकाला हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) बहाल करते. त्याचा फायदा उचलत बांधकाम व्यावसायिक भुसंपादनाला हातभार लावतात आणि करोडो रूपयांचा टीडीआर कवडीमोल भावाने जमिन मालकाकडून पदरी पाडून घेतात. टीडीआर व्यवहारांमुळे अनेकांकडे करोडोंची माया जमा झाली आहे.
भोसरी, मोशी, चिखली, च-होली, रावेत, वाकड, चिंचवड, ताथवडे, पुनावळे, किवळे, मामुर्डी, पिंपळे-निलख या नव्याने विकसित होणा-या भागात गृहप्रकल्पांचे जाळे विणले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर टीडीआरचा वापर झाला आहे. मात्र, टीडीआर घेताना काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रचलीत नियमानुसार जीएसटी भरला नसल्याच्या तक्रारी राज्य जीएसटी विभागाला
प्राप्त झाल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत जीएसटी अधिका-यांचे पथक 31 मे रोजी महापालिकेत धडकले आहे. तक्रारीनुसार, टीडीआर व्यवहारांच्या फाईल्सची तपासणी सुरू केली आहे. फाईल्समधील टॅक्स इनव्हॉईस, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि काही महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करुन कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती ताब्यात घेतल्या जात आहेत.
कर बुडवेगिरी करणा-या बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांचा खुलासा मागविण्यात येणार असल्याचे जीएसटी पथकातील अधिका-यांनी दिली. तीन दिवसांपसून सुरू असलेल्या या कारवाईमुळे बांधकाम परवाना विभागातील काही अधिका-याचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेनंतर जीएसटी विभागाचे पथक शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयावर धडकणार आहे. जागांच्या खरेदी – विक्री व्यवहाराची तपासणी पथकामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे जीएसटी बुडविणा-या बिल्डर लॉबीची पाचावर धारण बसली आहे.
शहर अभियंता मकरंद निकम प्रसार माध्यमांना म्हणाले, राज्य शासनाच्या जीएसटी विभागाचे पथक तपासणी करत असून महापालिका त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्यांनी मागणी केलेल्या टीडीआर खरेदी – विक्री व्यवहारासंबंधी सर्व फाईल्स ताब्यात देण्यात आल्या आहेत.