पिंपरी (Pclive7.com):- लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये मुंबईतील एक तरुण पयर्टक सोमवारी (दि.११) बुडला होता. या घटनेमुळे सायंकाळी पाच नंतर भुशी धरणाकडे जाणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याठिकाणी होणारी पर्यटकांची आणि त्यातून वाढलेला अपघाताचा धोका लक्षात घेत लोणावळा नगरपरिषद व लोणावळा पोलिसांकडून तसे सुचनाफलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
सध्या लोणावळा शहरात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्याने धरणाच्या पाण्यात जाणे धोकादायक असल्याने प्रशासनाने सायंकाळी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणारी वाहनं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर देखील या निर्णयामुळे परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मालकीचे असणारे हे धरण मागील अनेक वर्षापासून लोणावळ्यातील पर्यटनाचे प्रमुख केंद्रबिंदू राहिलेले आहे. दरवर्षी साधारण जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे धरण १०० टक्के भरते. एकदा का हे धरण त्याच्या पूर्ण क्षमतेने भरून वाहायला लागले की याठिकाणी पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरते.