पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश आज (दि.१६) रोजी जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, श्री.शेखर सिंह शासनाने आपली नियुक्ती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त या पदावर श्री. राजेश पाटील (भाप्रसे) यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनात करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. पाटील यांच्याकडून त्वरित स्वीकारावा असे म्हटले आहे.
राज्यातील सत्ता बदलामुळे राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी राजेश पाटील यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पाटील यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी धार्जिने असा आरोप महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांकडून होत होता. गेल्या काही दिवसांपासून भाजपा सदस्य तसेच आमदारांची राजेश पाटील यांच्याकडून विविध प्रकारे अडवणूक होत असल्याचा आरोप होत होता.
आता राज्यात सत्ता बदल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे. आगामी महापालिका निवडणूक तोंडावर आहे म्हणूनच भाजपला मदत व्हावी म्हणूनच राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आणि त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेखर सिंह हे पूर्वी साताऱ्याचे जिल्हाधिकारी होते.
▪️ कोण आहेत शेखर सिंह?
मार्च २०२० मध्ये शेखर सिंह यांनी साता-याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोना महामारीचे संकट जिल्ह्यावर आले होते. या महामारीत महसूल विभागाची यंत्रणा हाताशी घेऊन अत्यंत त्यांनी महामारीचा धैर्याने मुकाबला केला. जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध विकास योजना, जंबो कोविड हॉस्पिटल, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, भूस्खलनग्रस्तांना मदत आदी महत्वाच्या प्रसंगी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन जनतेला जास्तीत जास्त मदत केली.सातारा शहराची हद्दवाढ, डीपीडीसी मधील निधी संदर्भातील विविध स्त्रोतांचे बळकटीकरण याचे मंत्रालयात सादरीकरण करणारे शेखर सिंह यांची कार्यपद्धती नेहमीच वाखाणली गेली. राज्य स्तरावर साताऱ्याचे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक झाला आहे.