पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात सध्या कचरा समस्या गंभीर झाली आहे. येथील कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून या कामात हलगर्जीपणा होत आहे. म्हणूनच कचरा उचलणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचे काम मे. अँन्थोनी ग्रुप प्रा.लि या कंपनीला दिले आहे. या कंपनीतर्फे रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील दैंनदिन कचरा हा वेळेवर उचलला जात नाही. याबाबत त्यांना याचे उत्तर मागितल्यास त्यांच्याकडून गाडी उशिरा येणार असल्याचे उत्तर सांगण्यात येते.
दरम्यान महापालिका आरोग्य विभागातर्फे तो पर्यंत कचरा सोसायटी आवारात ठेवावा अश्या सूचना केल्या जातात. सोसायटी मधील हाउसकीपिंग कामगार हे सकाळच्या वेळेतच उपलब्ध असतात. कचरा उचलणारी गाडी सायंकाळी येण्याच्या वेळेत कचरा टाकण्यास कोणी कर्मचारी भेटत नाही. अश्याने तो कचरा सोसायटी परिसरात राहतो व तो वेळेवर न उचलल्याने सोसायटी परिसरात दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून, कचऱ्याची तक्रार सोसायटीच्या वतीने केल्या जात आहेत. आमच्या पाहणीच्या वेळेत संबंधित कंपनीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या या नादुरुस्त अवस्थेत दिसून आल्या आहेत. तसेच त्यांचे वारिष्ठ अधिकारी बघू करू सांगतो अशी उडवा-उडवीची उत्तरे देतात.
सोसायटी व परिसरात कचरा साठून राहणे व न उचलणे हि खूप गंभीर बाब आहे. तरी रहाटणी-पिंपळे सौदागर मधील कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व दैनंदिन कचरा उचलणाऱ्या कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तरी रहाटणी-पिंपळे सौदागार मधील कचऱ्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी निवेदनात केली आहे.