पिंपरी (Pclive7.com):- स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकविणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील ५३ हजार व्यापाऱ्यांना महापालिकेच्या एलबीटी विभागाने नोटिसा दिल्या आहेत. तसेच, थकबाकीदार व विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेने १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी कर वसुली सुरू केली आहे. एलबीटीसाठी शहरातील ३५ हजार ८९२ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील केवळ २० हजार २३३ जणांनी एलबीटी कर भरला आहे. थकीत कर भरण्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले आहे. त्यातील केवळ १० टक्के व्यापाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. पाच हजार २३८ जणांना अंतिम कर भरण्याचा आदेश दिला आहे.
तीन पथकांची नियुक्ती..
महापालिकेच्या वतीने एलबीटी वसुलीसाठी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत जकात वसुली केली जात होती. एलबीटी स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत महापालिका करवसुलीत अव्वल ठरली आहे. पहिल्याच वर्षी एलबीटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला होता.
एलबीटी रद्दचा प्रस्ताव..
एलबीटी रद्द करण्याचा प्रस्ताव आगामी काळात राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकार जोपर्यंत एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांना एलबीटी भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका एलबीटी वसुली करण्यात येत आहे.





















Join Our Whatsapp Group