पिंपरी (Pclive7.com):- अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द करून अन्यायकारक वागणूक दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांनी मुंबईतील महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली आहे. मात्र, उपायुक्त झगडे यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्त पदावर राज्य शासनाने नियुक्ती केली होती. मात्र, त्यांना आयुक्त सिंह यांनी रूजू करून घेतले नाही. दहा दिवसांनी झगडे यांची नियुक्ती शासनाकडून अचानक रद्द झाली. त्या जागी प्रदीप जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली.
अन्यायकारकपणे पद्धतीने नियुक्ती रद्द झाल्यामुळे झगडे यांनी थेट मॅटमध्ये दाद मागितली. त्यामध्ये राज्य शासन, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यावर सुनावणी सुरू असताना झगडे-जांभळे यांच्यातील नव्या वादाला तोंड फुटले आहे. उपायुक्त झगडे यांच्याकडे असलेला एबीटी विभागाचे नियंत्रण अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्याकडे आहे. विविध बैठकांना वारंवार गैरहजर राहणे, तसेच काही प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचा ठपका झगडे यांच्यावर ठेवत अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी आयुक्तांना अहवाल पाठवून कारवाईची शिफारस केली होती. त्यावरून आयुक्त सिंह यांनी झगडे यांना हलगर्जीपणा, निष्काळजीपणा व सेवा नियमांचा भंग करणारे वर्तन केल्याबद्दल नोटीस बजावली आहे.
या नोटीसवर खुलासा देण्यास केवळ ४८ तासांची मुदत दिली. झगडे यांनी विनंती केल्यानंतर ती मुदत १० दिवसांनी वाढविण्यात आली आहे. या नोटिसीची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.