हिंजवडी (Pclive7.com):- कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तारीख पे तारीख या वेळखाऊ धोरणाला वैतागून शेतकऱ्याने रागाच्या भरात चांदखेड येथील सव्वा एकर ऊस क्षेत्राला आग लावल्याची घटना रविवारी (दि.११) दुपारी घडली. संतोष बारणे असे त्रस्त झालेल्या व ऊस जाळणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

संतोष बारणे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते असून त्यांची चांदखेड (ता. मावळ) येथे पाच एकर शेती आहे. त्यांनी जुलै २०२१ मध्ये ऊस लागवड केली. कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात बियाणं उपलब्ध नसल्याने त्यांनी साताऱ्याहून बियाणं आणून लागवड केली. ऊस लागवड तसेच ऊस बांधणीसाठी सर्व खते वापरली, सर्वतोपरी काळजी घेतली. मशागतीची व खतांची सर्व बिले असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊस मोठा झाल्यानंतर १४ महिन्यांनी ऊसतोड होणे अपेक्षित होते मात्र तसे काही झाले नाही.

ऊसाचे वजन घटण्याआधी, त्याला तुरे येण्याआधी वेळेत ऊसतोड व्हावी म्हणून कारखान्यातील अधिकाऱ्यांशी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. मात्र, वेळोवेळी त्यांना तारखाच मिळाल्या. पाच एकर पैकी २५-३० गुंठ्यातील ऊस पोसला नव्हता त्याचे कारण देत चांगल्या प्रतीचा ऊस तोडण्यासाठीही उशीर केला. अखेर तीन महिन्यांनी ऊस तोडणीसाठी टोळ्या दाखल झाल्या. सुमारे चार एकरातील ऊसतोड झाल्यानंतर सव्वा एकरातील ऊस तोड न करताच टोळी गायब झाली. यानंतर पुन्हा कारखानाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता आज-उद्या असे करत त्यात महिना उलटल्याने संतप्त बारणे यांनी राहिलेला ऊस जाळून राख केला.
अधिकाऱ्यांच्या टोलवा टोलवीला वैतागुणच ऊस जाळून लाख रुपयांचे नुकसान केले आहे. शिरूर, हवेली, जुन्नर व इतर तालुक्यात वेळेवर ऊसतोड होते. मात्र, मावळ-मुळशीतील शेतकरी चेअरमन नानासाहेब नवले यांचा आदर करत असल्याने सौजन्य दाखवतात. याचाच अधिकारी गैरफायदा घेऊन छळ करतात. कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी मुद्दामहून विलंब केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, शेतीही गुंतून राहते.– संतोष बारणेऊस उत्पादक शेतकरी, थेरगाव .त्या ऊसाची योग्य देखभाल व मशागत न केल्याने थोड्या ऊसाची गुणवत्ता खराब होती. अशा ऊसाची ऊसतोड करण्यास ऊसतोड कामगार टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांची जुळवाजुळव करण्यात वेळ गेल्याने काही प्रमाणात ऊस तोडीस उशीर झाला.– साहेबराव पठारेमुख्य कार्यकारी अधिकारी श्री संत तुकाराम साखर कारखाना.





















Join Our Whatsapp Group