पिंपरी (Pclive7.com):- अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी लोकसभेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी सर्वक्षेत्रांसाठी घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे.
महेश लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात देशातील सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवरुन ७ लाखांपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईलवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच, पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६ टक्क्यांनी वाढ, लघु उद्योजकांसाठी क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम, ९ हजार कोटींची तरतूद, युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी, १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन, नैसर्गिक खतांच्या वापराला प्रोत्साहन, हरित ऊर्जा क्षेत्रासाठी ३५ हजार कोटींची तरतूद, ५- जी सेवा ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी १०० लॅब उभारणी, ई- कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्पयाकरिता ७ हजार कोटींची तरतूद, पॅनकार्डचा उपयोग कॉमन आयडी म्हणून घोषणा असे सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू माणून महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केल्या आहेत.
समावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा विकास करणे, हरित विकास, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र या सात प्रमुख उद्देशाने केंद्र सरकार काम करीत आहे. ही बाब सामान्य नागरिकांच्या दृष्टीने समाधानकारक आहे. तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आम्ही या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो असे महेश लांडगे यांनी म्हटले आहे.