पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मतदार संघात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून शिवसेना (ठाकरे गट) मधून तब्बल आठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गौतम चाबूकस्वार यांनी आदेश देत ही कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर पक्षाकडून खुलासा करण्यात आला आहे. हकालपट्टीची कारवाई केलेले चिंचवडमधील सर्व पदाधिकारी शिवसेनेतच आल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा संघटक अनिता तुतारे, उपशहर संघटक रजनी वाघ, विभाग संघटक शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा संघटक गणेश आहेर, रवी घाटकर यांची गैरसमजुतीने इतर वृत्तपत्रांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केल्याची बातमी छापून आली होती.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व पदाधिकारी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच असून, त्यांना दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.