पिंपरी (Pclive7.com):- अन्न व औषध प्रशासनाने शहरातील अन्न विक्रेत्यांसाठी घेतलेल्या स्वच्छता कार्यशाळेला फेरीवाले- टपरीधारकांसह अन्न विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद केलेल्या ८५ विक्रेत्यांना परवाने व ॲपरन देण्यात आले. पिंपरीतील कै. लोखंडे सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संपत देशमुख, सहा आयुक्त संजय नारागुडे, अन्न सुरक्षा अधिकारी एस पी धुळे, अन्न सुरक्षा अधिकारी के.बी जाधव, आर.जे जेगटे, एल.एस साळवे, आर.जी नागवेकर, दिलीप करंजखेले, दयानंद विर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय नारागुडे म्हणाले कि,स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्या. भविष्यात अन्न विक्रेता परवाने धारकास अन्न प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. ग्राहक हा तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे खाण्यासाठी येत असतो. त्यांना स्वच्छ व आरोग्यदायी खाद्यपदार्थ देणे हि तुमची नैतिक जबाबदारी आहे. या बाबतीत जो कायद्याचे उल्लंघन करेल त्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी सुमारे अडीचशे खाद्यपदार्थ विक्रेते सहभागी झाले होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभागाबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी धुळे यांनी स्वच्छतेबाबतीत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सावळे यांनी तर आभार दिलीप करंजखेले यांनी मानले.