पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदार संघातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी विधानसभा सदस्य व ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’ आणि शिवसेनेची ‘पिपाणी’ असे चित्र मतदार संघात पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या पिपाणी वाजवू नये, लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे, बालिश नेता आहे, बेईमानी, गद्दारी…अशा असंसदीय शब्दांत राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते भिडले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंचरमध्ये नुकतेच राज्य सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांच्यावर जहरी टीका केली. शिमगा सण वर्षातून एकदा असतो. पण, काहीजण रोज शिमगा साजरा करतात. खासगी कारखाना सुरु झाला. त्याचा खासदार आढळराव यांना फार राग आला. त्यांनी भीमाशंकरची चिंता करू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडा. गल्ली बोळात फिरून पिपाणी वाजवू नका, अशा शब्दांत वळसे-पाटील यांनी आढळराव यांना सुनावले होते.
त्यानंतर खासदार आढळराव यांनीही वळसे-पाटील यांना लक्ष्य केले आहे. खासदार आढळराव पाटील म्हणाले की, वळसे-पाटील यांच्याप्रमाणे मी कधीही नीच पातळीवरील, घाणेरडे राजकारण आजपर्यंत कधीही केलेले नाही. वळसे-पाटील यांचे शिरुरमधील रेल्वेच्या कामाबाबाबत अज्ञान आहे. वळसे-पाटील हा अज्ञानी, बालीश आणि ज्याला फारसेकाही माहित नसलेला राजकारणी आहे. लोकांसमोर खोट्या गोष्टी सांगून चमकायचे हा त्यांचा धंदा आहे. हिंमत असेल, तर वळसे-पाटलांनी भाजपाच्या नेत्यांच्या गाड्या आडवून दाखवाव्या. आंदोलन करणे हा शिवसेनेचा बाणा आहे. मंचरमध्ये लोकांना दाखवण्यासाठी आंदोलन करतात आणि तिकडे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे ‘सेटिंग’ करतात, असा टोलाही खासदार आढळराव पाटील यांनी केला आहे.
देवदत्त निकम किरकोळ कार्यकर्ता…
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या टीकेला उत्तर देणे संयुक्तिक ठरणार नाही. कारण, ते माझ्यादृष्टीने खुपच किरकोळ कार्यकर्ते आहेत. अशा खालच्या पातळीवरील कार्यकर्त्यावर टीका-टिप्पण्णी करणे हे माझ्यादृष्टीने कमीपणाचे आहे. तसेच, रेल्वेच्या कामासंदर्भात दिलीप वळसे-पाटील यांनी लोकांना फसवणे बंद करावे, त्यांनी केंद्राच्या योजनांमध्ये लडबूड करु नये. प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ‘हल्लाबोल’ सारख्या खोट्या आंदोलनात खासदारांवर घाणेरडे आरोप करणे, असे बोगस धंदे बंद करावे, असा इशाराही खासदार आढळराव पाटील यांनी दिलीप वळसे-पाटील यांना पत्रकारांशी बोलताना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा कपाळमोक्ष…
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांशी ‘तोडपाणी’ सुरु असते. आम्ही सत्तेत असताना सरकारला विरोध करीत आहोत. पण, राष्ट्रवादीचे नेते आतून भाजपाला पाठिंबा देतात. आंबेगाव, मंचर तालुक्यात हिच परिस्थिती आहे. भाजपाच्या नेत्यांविरोधात बोलण्याची ताकद दिलीप वळसे-पाटील यांची नाही. ते भाजपाला ‘मॅनेज’ होणारे आहेत. भीमाशंकरच्या यंत्रणेचा वापर करुन खासगी कारखाना उभा करणा-या वळसे-पाटील यांनी ‘पराग’मध्ये कुणाचे किती शेअर आहेत, ते जाहीर करावे, असे खुले आव्हानही खासदार आढळराव पाटील यांनी दिले. तसेच, बैलगाडा शर्यतीसंदर्भात खासदार शरद पवार यांनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत कितीवेळा तोंड उघडले, याची माहिती घ्यावी, अशी टीकाही खासदार आढळराव-पाटील यांनी केली. वास्तविक, खासदार आढळराव पाटील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. तसेच, दिलीप-वळसे पाटील यांच्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत ताकद मिळाली, असे बोलले जाते. त्यामुळे शिरुरमध्ये खासदार आढळराव पाटील यांनी केलेली टीका पाहता राष्ट्रवादीला कापाळमोक्ष करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रीया राजकीय विश्लेषकांमध्ये व्यक्त होताना दिसते.






















Join Our Whatsapp Group