पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडगावात पीएमपीएलची बस आगीत जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली.
चिंचवडगावात पीएमपीचे बस स्थानक आहे. एमएच १२ एचबी ४०१ या क्रमाकांची पीएमपीची बस चिंचवड स्थानकात आली होती. स्थानकाबाहेर बस उभी होती. त्यावेळी पावणेदोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलातील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली आहे. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.