पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे. काटे यांनी निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर, रहाटणी येथील महत्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. या निवेदन म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ मधील काटेवस्ती येथील मिलिटरी हद्दीमधून जाणारे रक्षक रोड काही वर्षापूर्वी वाहतुकीस कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. प्रभागात साधारण ६० ते ७० हजार नागरीवस्ती असून दिवसेंदिवस त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वाढती लोकसंख्येचा विचार करता प्रभागातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. सतत वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी जीवघेणे अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

परिसरातील नागरिकांना औंध रुग्णालय, पोस्ट ऑफिस याठिकाणी जाण्यासाठी तसेच पुण्यात नोकरी करणारे नोकरदारवर्ग, शालेय विद्यार्थी यांना येण्या-जाण्यासाठी ५ किमी लांब फिरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. एवढा मोठा फेरफटका मारण्याऐवजी जर हे मिलिटरी हद्दीतील फक्त ६५० मी.लांब रस्ता जर वाहतुकीस खुला करण्यात आला तर ५ किमी लांब फिरून ये-जा करण्यास नागरिकांचे हाल होणार नाहीत. म्हणून यावर उपाय म्हणून प्रभाग क्र.२८ मधील काटेवस्ती येथील मिलिटरी हद्दीमधून जाणारे रक्षक रोड नागरिकांच्या वाहतुकीस खुला करण्यासंदर्भात मिलिटरी विभाग प्रतिनिधींसोबत चर्चा करून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावी.
तसेच काटेवस्ती ते प्लॅनेट मिलेनियम सोसायटीच्या मागच्या गेटपर्यन्त जागेवर असलेला ७ मी. अरुंद रस्ता मिलेटरीच्या हद्दीमधून १८ मी. पर्यन्त रुंद करून विस्तार करणे बाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेणेबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात पिंपळे सौदागर येथील काटेवस्ती ते प्लॅनेट मिलेनियम सोसायटीच्या मागच्या गेटपर्यन्त अरुंद असा डीपी रस्ता आहे. सद्यस्थितीला जागेवर ७ मी.अरुंद रस्ता असून सदर रस्ता १८ मी. पर्यन्त रुंद करून विस्तार करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर परिसरात नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना दळणवळण करण्यास खूप मोठी गैरसोय होत आहे. एका बाजूने मिलिटरी हद्द आहे आणि दुसर्या बाजूस नागरिकांची वस्ती असल्याने उपलब्ध रस्ता वाहतुकीस कमी पडत आहे.
उपलब्ध असलेल्या ७ मी. अरुंद रस्त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय आणि झपाट्याने वाढणारी नागरीवस्ती लक्षात घेता भविष्यात या रस्त्यावरील वाढणारे अतिरिक्त वाहतुकीचे भाराचा विचार करता काटेवस्ती ते प्लॅनेट मिलेनियम सोसायटीच्या मागच्या गेटपर्यन्त जागेवर असलेला ७ मी. अरुंद रस्ता मिलेटरीच्या हद्दीमधून १८ मी. पर्यन्त रुंद करून विस्तार करणे अत्यंत महत्वपूर्ण असून या बाबतचा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करून घ्यावेत असे शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




















Join Our Whatsapp Group