पिंपरी (Pclive7.com):- कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून विशेष कार्य अधिकार्याने वायसीएम रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकाला धमकी दिल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी आज रुग्णालयासमोर आंदोलन केले.
कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना शुक्रवारी (दि.८) धमकी दिली होती. ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईल’. माझ्या नादाला लागाल तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली होती. याबाबत डॉ. देशमुख यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच डॉ. पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.
दोन दिवस महापालिकेला सुट्टी होती. त्यामुळे धमकी प्रकरण शांत होते. सोमवारी कामकाज सुरु होताच वायसीएमएचच्या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ आंदोलन केले.