आळंदी (Pclive7.com):- मराठा समाजाला आरक्षण व मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून व्यंकट ढोपरे (वय ६०) या वृद्धाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आळंदीमधील इंद्रायणी नदीत ढोपरे यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले अन कुटुंबियांना घरातच एक चिठ्ठी सापडली.
त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच २०१२ पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाही, याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे, असा आशय त्या चिठ्ठीत होता. घरात चिठ्ठी सापडल्यानंतर कुटुंबियांनी भोसरी येथे राहणाऱ्या जावयास चिठ्ठीबाबत कळवले.
तेव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत ढोपरे यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल अन ज्ञानेश्वरीमधील काही कागदं आढळली. त्याच बंधाऱ्यात पोलीस आणि एनडीआरएफकडून शोध सुरू झाला. आज दुपारी बंधाऱ्यालगतच ढोपरे यांचा मृतदेह आढळला. त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतली असेल, असा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदन अहवालातून आणखी माहिती समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.