पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील नागरिकांना विनासिग्नल प्रवास करता यावा यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार गोविंद यशदा चौक, सुदर्शननगर चौक तसेच कोकणे चौकात लवकरच ग्रेड सेपरेटर आणि सब-वे उभारण्याच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी दिली.
पिंपळे सौदागर हा परिसर शहरातील सर्वाधिक झपाट्याने विकसित झालेला परिसर आहे. शहरातील उच्छभ्रू आणि शांत परिसर म्हणून या भागाची ओळख झाली आहे. हिंजवडी आणि पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या जवळ असल्यामुळे पिंपळेसौदागर परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. आता पिंपळेसौदागर परिसर सिग्नल फ्री करण्याच्या दृष्टीने भाजपने पाऊल उचलले आहे. असे निर्मला कुटे यांनी सांगितले आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, पिंपळे सौदागर परिसराचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग आहे. त्यामुळे या भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा सोडविण्याचा प्रयत्न आहे. गोविंद यशदा चौकात सब-वे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे सुदर्शन चौकात ग्रेड सेपरेटर प्रस्तावित असून त्यासाठी २४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चालाही लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच साई चौक येथील वाहतूकीची समस्या सोडविण्याच्या उद्देशाने कोकणे चौक ते काळेवाडी हा एचसीएमटीआर रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.