पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत मित्राला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन पोलिसांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ऑनलाइनद्वारे ४ लाख ९८ हजार घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
याप्रकरणी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक केली आहे. तर, पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळसह शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे मूळ रा. झारखंड) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुण हा पिंपरी- चिंचवडमधील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा विश्वास संपादन केला. त्याची सर्व माहिती घेतली. तो श्रीमंत असल्याचं कळताच त्याच्याकडून पैसे उकळायचं ठरवलं. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी किवळे येथील एका कॅफे मधून त्याचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तेथून देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पोलिसांसह आरोपींच्या धमकीला घाबरलेल्या चौहानने गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना ४ लाख ९८ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group