पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाने आज श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे पाटील यांना संधी दिली आहे. त्यामुळे मावळ लोकसभेत महायुतीचे श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात थेट सामना होणार आहे.
श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत. गेली दहा वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लोकसभेतील सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सोळाव्या लोकसभेत सलग पाच वेळा संसद रत्न पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. सलग दोन टर्म ते शिवसेना पक्षाचे खासदार राहिले आहेत. मात्र शिवसेना फुटी नंतर ते शिवसेना शिंदे गटात सामील झाले. आता मावळ लोकसभेत शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असलेले महायुतीची ते उमेदवार आहेत.
महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संजोग वाघेरे पाटील यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली आहे. संजोग वाघेरे पाटील हे गेल्या ४० वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. परंतु डिसेंबर महिन्यात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वाघेरे यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. मूळचे काँग्रेसमध्ये असलेले वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे हे पिंपरीगावाचे सरपंच, तसेच शहराचे महापौर होते. स्वतः संजोग हेही काँग्रेसकडून महापौर तर पत्नी उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.