पिंपरी (Pclive7.com):- आपल्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढते, असे म्हणत आयटीयन्स असलेल्या दोन विवाहितांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात एकमेकींना चावा घेत जखमी केले. तसेच वाहनाची तोडफोड केली. हिंजवडी-माण हिंजवडी आयटी पार्क येथील फेज ३ येथे १७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.२७) परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी आयटीयन्स असलेल्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा पती आणि संशयित आयटीयन्स महिलेची तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या ठिकाणी ओळख झाली. त्यातून ते एकमेकांच्या संपर्कात आले. यातून संशयित महिलेने फिर्यादी महिलेच्या पतीच्या मागे लागून त्यांना वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याने तिला समजावण्यासाठी बोलावले. त्यानुसार फिर्यादी महिला आणि तिचा पती हे दोघे हिंजवडीतील फेज ३ येथे गेले.
तेथे संशयित महिलेला समजावून सांगत असताना तिने फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. तिच्याकडील पाण्याची स्टीलची बाटली डोक्यात मारून मानेच्या मागे चावा घेऊन दुखापत केली. तसेच शरीरावर ठिकठिकाणी नखे मारून ओरखडले. फिर्यादी महिलेचे मणी मंगळसूत्र तोडून त्यांच्या चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान केले. परस्परविरोधात आयटीयन्स महिलेने संशयित महिला आणि तिच्या पतीच्या विरोधात फिर्याद दिली.
परस्परविरोधी तक्रार..
फिर्यादी महिलेने घटस्फोटाची मागणी केली असून, त्या पतीपासून विभक्त राहत आहेत. दरम्यान, संशयित महिलेच्या पतीसोबत तिची ओळख झाली. यातून तो फिर्यादी महिलेला वारंवार फोन करायचा. त्याबाबत चर्चा करण्यासाठी हिंजवडीतील फेज ३ येथे फिर्यादी महिला गेली असता संशयित महिलेने आणि तिच्या पतीने त्यांना मारहाण केली. तसेच संशयित महिलेने फिर्यादी महिलेला चावा घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.