पिंपरी (Pclive7.com):- ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून आरोपींनी पैसे गुंतवणुकीवर १६५ टक्के नफ्याचे आमिष देत निगडीमधील एका महिलेची ११ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना यावर्षी ५ जानेवारी ते १३ मार्च दरम्यान वेळोवेळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे वास्तव्यास असणाऱ्या महिलेस आरोपी मनीष कुमार, अंकिता गुप्ता, राहुल शर्मा यांनी तिघांनी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले. ॲप्लिकेशनद्वारे शेअर्स व आयपीओमध्ये ११ लाख १० हजार रुपये गुंतवायला सांगून १६५ टक्के नफ्याचे आमिष दिले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी महिलेने रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी आरोपींनी महिलेस आणखी पैसे गुंतवून सक्तीने आयपीओ खरेदी करण्यास सांगितले. यास महिलेने नकार दिल्यावर आरोपीने ॲप्लिकेशनचे ॲक्सिस काढून फिर्यादीने गुंतविलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. याविरोधात महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.