पिंपरी (Pclive7.com):- पुणे शहर, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.१३) मतदान होणार आहे. या तीनही मतदासंघांचा काही भाग पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. त्यात आयुक्तालयाच्या हद्दीत ४०७ मतदान केंद्रे, तर १ हजार ७८७ बूथ आहेत. त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानप्रक्रियेसाठी सहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. संवेदनशील केंद्रांवर जादा कुमक तैनात करण्यात येणार आहे. विशेष पथकांकडूनही अशा केंद्रांवर ‘वॉच’ राहणार आहे.
काल प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार सहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. यामध्ये पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सहा उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, ३२५ अधिकारी (पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक), चार हजार अंमलदार, १५०० होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सहा पथकांचा समावेश आहे. यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहराबाहेरून मागवला आहे.