हिंजवडी (Pclive7.com):- कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या तडीपार गुंडाकडून पोलिसांनी कोयता जप्त केला. त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करत पोलिसांनी २८ हजारांच्या बनावट चलनी नोटा, १० दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केल्या. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. अक्षय उर्फ सोन्या काळूराम हुलावळे (२९, रा. हुलावळे वस्ती, साखरे वस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अक्षय हुलावळे याच्या विरोधात हिंजवडी, वाकड, चिंचवड, सांगवी, पिंपरी, दिघी, सिंहगड रोड पोलिस ठाण्यांमध्ये १९ गुन्हे दाखल आहेत.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये पोलिसांना अक्षय हुलावळे हा आढळून आला. त्याच्याकडे कोयता मिळाला. हुलावळे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २० नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आल्याने त्याच्यावर कारवाई केली.
दरम्यान, हुलावळे याच्यावर नकली नोटा तयार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचे साथीदार अटक असून, तो फरार होता. त्यामुळे हिंजवडी पोलिसांनी अक्षय हुलावळे याला त्या गुन्ह्यात अटक केली. हुलावळे याने त्याच्या चार साथीदारांसोबत मिळून सातारा जिल्ह्यातील वाई येथे नकली नोटा तयार केल्या होत्या. हुलावळे याच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपये दराच्या ५६ बनावट चलनी नोटा जप्त केल्या. तसेच अक्षय हुलावळे हा वाहन चोरीच्या गुन्ह्यातील संशयित असल्याने त्याच्याकडे त्याबाबत चौकशी करत चोरीच्या दहा दुचाकी आणि दोन तीनचाकी रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.