हिंजवडी (Pclive7.com):- पोलिसांच्या मोटारीने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी चालक, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीत फौजदाराने मद्यपान केल्याचेही निष्पन्न झाले आहे. मंगळवारी (४ जून ) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर हा प्रकार घडला होता.
नागेश भालेराव असे निलंबित सहायक फौजदाराचे नाव आहे. भालेराव हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. या अपघातात शंकुतला पंडित शेळके (रा. म्हाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी जागा दिलेली नसतानाही भालेराव हा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर गेला. मोटारीत बसला असताना गाडीचे इंजिन सुरू होते. भालेराव याचा पाय ॲक्सिलेटरवर पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भालेराव यांनी मद्यसेवन केले असल्याचा संशय आला. त्यामुळे भालेराव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये घटनेच्या आधी भालेराव यांनी दारूचे सेवन केल्याचे उघड झाले. भालेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
या अपघातप्रकरणी सहायक फौजदार भालेराव यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी दारूचे सेवन केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात आले आहे. त्यांची खात्याअंतर्गत चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.