पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे महानगरपालिकेच्या वतीने सुमारे ४ एकर एवढ्या क्षेत्रात, आत्याधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त योगा पार्क बांधण्यात आले आहे. या पार्कचे काम पूर्ण झाले असून जून महिना अखेरीस ते नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत ३२४ कोटींची विविध विकास कामे करण्यात आली असून त्याअंतर्गत योगा पार्क देखील विकसित करण्यात आले आहे. हे योगा पार्क याच जुन महिन्याच्या अखेरिस नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे, सुरूवातीला या पार्क मध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु या पार्कची निगराणी राखण्याकरीता पार्कमध्ये येण्यासाठी वेळ व प्रवेश शुल्क ठरवले जाणार आहे. यामध्ये महापालिकेच्या वतीने प्रत्येक व्यक्ती मागे ५ किंवा १० रूपये शुल्क आकारण्यात येईल, जेणेकरून या पार्कचे महत्व व काळजी राखली जाईल.
या पार्कमध्ये नागरिकांसाठी क्लाइबिंग गेम्स, स्केटिंग, स्पेशल योगा सभागृह, मैदान असेल तसेच लहान मुलासाठी स्वतंत्र खेळणी असतील. तसेच प्रशस्त वॅाकींग ट्रॅक असेल. हे योगा पार्क पिंपळे सौदागरच्या विकासात भर टाकणारे असणार आहे. तसेच या योगा पार्कमुळे नागरिकांना स्वतंत्र पार्कचा अनुभव घेता येईल.
या पार्कचे काम लवकर पुर्ण करण्यात तसेच हे पार्क लवकर खुले व्हावे म्हणुन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यास यश म्हणुन हे पार्क जून महिना अखेरीस खुले होणार असल्याची माहिती नाना काटे यांनी दिली.