पिंपरी (Pclive7.com):- तळवडे कॅनबे चौकात रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या संख्येने पाईपचा ढीग पडलेला आहे. या पाईपमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून हे पाईप तात्काळ हटवण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे. बिरादार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका तसेच वाहतूक पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिले आहे.
तळवडे येथील कॅनबे चौकातील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाईप्स ठेवण्यात आलेले आहेत. आधीच हा रस्ता अरुंद आहे. तसेच या चौकातून चाकण एमआयडीसीला जाता येते, या परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या व औद्योगिक कंपन्या असल्याने या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक चालू असते. हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या पाईपांच्या ढीगामुळे प्रवाशांना तसेच वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे. याबाबत संबंधित यंत्रणा कोणतीच उपाययोजना करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तरी या तक्रारीची तात्काळ दाखल घेऊन मुख्य रस्त्यावर असणारे पाईप्स हटविण्यात यावेत अशी मागणी श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे.