पिंपरी (Pclive7.com):- गेल्या वर्षी २ एप्रिल २०१७ रोजी पिंपरी येथे केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत असून या पासपोर्ट कार्यालयातून एक वर्षात ३० हजार २५१ नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी येथील पासपोर्ट केंद्राच्या वर्षपूर्ती बाबत आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे एक वर्षापूर्वी उद्घाटन झाले. एक वर्षात एक वर्षात ३० हजार २५१ नागरिकांना पासपोर्ट मिळाले असून अनेक नागरिकांनी स्वतः मला भेटून समाधान व्यक्त केले आहे.
या अगोदर पुणे मुंढवा येथे पासपोर्ट कार्यालयात नागरिकांना जावे लागत होते. नागरिकांचा संपूर्ण दिवस त्यासाठी खर्ची पडत होता. त्याच बरोबर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मुंढवा येथे जाणे गैरसोयीचे होते. त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. पिंपरी येथे पासपोर्ट कार्यालय झाल्याने पिंपरी चिंचवड बरोबरच मावळ, चाकण, हिंजवडी या भागातील नागरिकांनाही हे पासपोर्ट कार्यालय सोयीचे झाले आहे. माझ्या कारकीर्दीतील हे नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या हिताचे काम झाल्याने मला देखील या बाबत समाधान वाटत असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.