पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) देहूरोड परिसरातील एका लॉजवर कारवाई करत अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेचा शोध घेतला आहे. संबंधित महिलेला पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तिला बांगलादेशात हद्दपार (डिपोर्टेशन) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीबीला १७ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वर्ग लॉजमध्ये एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. सुरुवातीला स्वतःची ओळख पश्चिम बंगालमधील रहिवासी म्हणून सांगणारी महिला संशयास्पद वाटल्याने तिची सखोल चौकशी करण्यात आली.

तपासादरम्यान तिच्याकडे असलेले आधारकार्ड बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर चौकशी केली असता तिचे खरे नाव फिहा मो. मुजिबुर रहमान (वय १९) असून ती बांगलादेशातील मदारगंज जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. सुमारे एक वर्षापूर्वी ती बांगलादेशातून अनधिकृतपणे भारतात दाखल झाल्याची कबुली तिने दिली. तसेच मोबाईलमधील आयएमओ आणि व्हॉट्सॲपद्वारे ती बांगलादेशातील आई-वडील व इतर नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले.
या प्रकरणात संबंधित महिलेला पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परकीय नागरिक नोंदणी शाखेमार्फत तिच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या २ मे २०२५ च्या परिपत्रकानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ हद्दपार करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत २ मे २०२५ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एटीबीने २९ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला असून त्यापैकी २६ जणांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित तीन जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली तसेच विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने केली.



















Join Our Whatsapp Group