पिंपरी (Pclive7.com):- अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने पुणे जिल्ह्यातील कुटुंबांसाठी ‘घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती, इतिहास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक संदेश या विषयांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात येणार असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घरगुती सजावटीतून घडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील घरगुती गौरी-गणपती सजावट करणाऱ्या सर्व कुटुंबांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सजावटीचे दोन छायाचित्रे आणि १ ते २ मिनिटांचा व्हिडिओ नाव, जिल्हा आणि संपर्क क्रमांकासह व्हॉट्सॲपद्वारे आयोजकांकडे पाठवावा लागणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २८ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेसाठी पात्र ठरलेले व्हिडिओ अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केले जातील. एका लाईकला १ गुण आणि एका वैध कमेंटला २ गुण देण्यात येणार आहेत. एका फेसबुक खात्याकडून एका व्हिडिओवर केलेली एकच कमेंट ग्राह्य धरण्यात येईल. तसेच फेक, पेड किंवा कृत्रिम एंगेजमेंट आढळल्यास संबंधित सहभागाबाबत अंतिम निर्णय आयोजकांकडून घेतला जाईल.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी सजावटीमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक व पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राहुल पवार (८१८०९१३३५५), संदीप निकम (९७६७२३२५२७), अमर भोसले (९८५०५१३१२३), अमोल भोसले (८३९०५५५५५८), कैलास बाकले (९५९५३५४५२३), अभिजीत जाधव (९८८१३५८२३६) आणि सुभाष पाटील (९५५२७४७३००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता संस्कार, संस्कृती, इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक जाणीवा जपणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group