पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागरच्या कुंजीर चौक येथील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारी (वर्ल्ड पार्क परिसर) असलेले सार्वजनिक शौचालय गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिक आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आज (दि.१८) मूक निषेध आंदोलन केले.

परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक वापरासाठी उभारण्यात आलेले हे शौचालय दीर्घकाळापासून बंद असून त्याच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे अस्वच्छता वाढली असून नागरिकांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच शौचालयाच्या इमारतीतील काही गाळ्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ई-सेवा केंद्रासाठी असलेल्या गाळ्यात पंचर काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे नागरिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित ठेकेदार सुबोध ठाकूर यांच्याकडे शौचालय बंद असण्याबाबत जाब विचारण्यात आला.
शौचालय सुरू न होण्यामागे कधी पाण्याची तर कधी वीजपुरवठ्याची अडचण असल्याची कारणे दिली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ज्येष्ठ नागरिकांनी तोंडावर हात ठेवून मूक निषेध नोंदवला. तसेच हे शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. पुढील दोन दिवसांत शौचालय नागरिकांच्या सेवेत सुरू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ज्येष्ठ नागरिकांनी दिला. दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे आणि नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न प्रशासनामार्फत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कुंदाताई भिसे यांनी दिली.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सार्वजनिक शौचालय सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group