पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ सोसायटीमध्ये आज (दि.१८) अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीत अडकलेल्या दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक नाना काटे आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदतकार्य वेगाने सुरू होण्यासाठी आवश्यक समन्वय साधला.

घटनास्थळी काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका घरात दोन लहान मुली अडकल्या असल्याची माहिती मिळताच जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतले. जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी प्रयत्नांमुळे दोन्ही मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
यानंतर अग्निशमन दलाने युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे आग परिसरातील इतर घरांमध्ये पसरू न देता परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेले धाडस, तत्परता आणि वेगवान बचावकार्य यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.



















Join Our Whatsapp Group