पिंपरी (Pclive7.com):- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देतानाच आजच्या मराठवाड्यापुढील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सिंचन व रोजगार प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले.

काळेवाडी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुंगळीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अरुण पवार, शारदाताई मुंढे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, गोपाळ माळेकर, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, नाना तांबारे, नरेंद्र माने, युवराज माने, प्रकाश इंगोले, बाळासाहेब साळुंखे, दिनेश पवार, महादेव स्वामी, किशोर अटगेकर, अंगद जाधव, भैरूजी मंडले, अनिता पांचाळ, कॅप्टन बालाजी पांचाळ, केशव बोधले, गोरख पाटील, सुग्रीव पाटील, लक्ष्मण जाधव, राधेश्याम शिंदे, संतोष भोरे, कृष्णा जाधवर यांच्यासह मराठवाडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनाजीराव येळकर पाटील म्हणाले, की जुलमी निजामशाहीच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात येऊन ७८ वर्षे झालेला मराठवाडा आजही उपेक्षित, मागास आणि तहानलेलाच आहे. सिंचन क्षेत्रातील अनुशेष भरून न निघाल्याने पाण्याची टंचाई आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी उद्योगधंद्यांना अपेक्षित चालना मिळत नाही. त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी राहते. उच्च शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि धंद्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे आणि उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढविणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील या परिस्थितीमागे येथील नेतृत्वाचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रास्ताविकात अरुण पवार यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास, त्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आजच्या पिढीची असलेली जबाबदारी याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, की मराठवाडा मुक्तिसंग्राम हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि लोकशाही मूल्यांसाठी दिलेल्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. त्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आज मराठवाड्याच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे.
डॉ. गणपतराव मोरे म्हणाले, की मराठवाड्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. शिक्षणामुळे व्यक्तीच्या आयुष्याला दिशा मिळते आणि शिक्षित समाजातूनच व्यापक समाज परिवर्तन घडू शकते. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, की मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. या इतिहासाची जपणूक करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाबरोबरच समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील सकारात्मक शक्तींना एकत्र आणून विकासाचा नवा मार्ग निर्माण करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी सांगितले.

डॉ. विवेक मुंगळीकर यांनी सामाजिक बांधिलकीचे महत्त्व सांगत समाजाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील युवकांमध्ये मोठी क्षमता असून, योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत यश मिळवू शकतात.
पुरस्काराला उत्तर देताना विक्रम गायकवाड यांनी मराठवाड्यातील युवकांमध्ये मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास उद्योग क्षेत्रातही मराठवाड्याची नवी ओळख निर्माण होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक अरुण पवार यांनी केले. सूत्रसंचालन अतुल क्षीरसागर यांनी, तर प्रकाश इंगोले यांनी आभार मानले.
मराठवाडा भूषण पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान..
उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम डेव्हलपर्सचे विक्रम गायकवाड यांचा, सामाजिक क्षेत्रासाठी स्नेहवन संस्थेच्या अर्चना देशमुख, अभिषेक इलेक्ट्रिकल्स व कन्स्ट्रक्शनचे दयानंद बळकटे, स्वातंत्र्य सेनानी स्व. माधवराव शामराव माने, कृषी क्षेत्रासाठी भाई धनंजय उद्धवराव पाटील, कला क्षेत्रासाठी बाल कलाकार अक्षता सूर्यवंशी यांचा ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.



















Join Our Whatsapp Group