पिंपरी (Pclive7.com):- भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीएमटी चौक परिसरात अवैधरित्या दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत भोसरी पोलीस आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संयुक्त कारवाई करत १८ अवैध टपऱ्या हटवल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत व्यवसायांवर आळा बसण्यासह सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रकारांना चाप बसणार असल्याचे सांगण्यात आले.

पीएमटी चौक हा भोसरीतील अत्यंत वर्दळीचा परिसर असून, येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काही पान व खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांच्या परिसरात मद्यपानाचे प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस आणि महापालिकेच्या संबंधित विभागाच्या संयुक्त पथकाने विशेष मोहीम राबवत परिसरातील टपऱ्यांची तपासणी केली. तपासणीत अतिक्रमण करून आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १८ टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधातही भोसरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत अशा प्रकारांमध्ये एकूण १७९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोसरी पोलीस ठाण्याकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अवैध व्यवसाय तसेच नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रकारांविरोधात यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group