पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळते. हे समाधान तुमच्याजवळ किती ही धनसंपदा असली तरी मिळू शकत नाही. पैशाने आयुष्य मिळमिळीत होते. आपण विविध क्षेत्रात कार्यरत असताना कितीही धावपळ, स्पर्धा असली तरी सामाजिक कार्यासाठी थोडावेळ राखून ठेवला पाहिजे. मानसिक समाधानातून तणाविरहित जीवन जगण्यास मदत होते. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता येतात. शिवाय अशा प्रयत्नांमधून समाजातील दरी कमी होण्यास मदत होते, असे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदगर येथील जर्वरी सोसायटी येथे उन्नती सोशल फाऊंडेशनचे उद्घाटन डॉ. आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उद्योजक शंकर जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात, उन्नती फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे तसेच चंद्रभागा भिसे, वसंत काटे, पवना सह. बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, नगरसेविका निर्मला कुटे, विजय भिसे, राजू भिसे, यशवंत काटे, आशा भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. आमटे म्हणाले की, आमच्या आजोबांची इच्छा होती की बाबा आमटे वकील व्हावे. परंतु, त्यांचे मन वकिलीमध्ये रमले नाही. रस्त्याने जाताना एक कुष्टरोगी रुग्ण पाहिला आणि ते अस्वस्थ झाले. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी कार्य करण्याचा निश्चय घेऊन आनंदवन ही संस्था सुरू केली. संस्थेमध्ये येणा-या रुग्णांवर आई-वडिलांप्रमाणे प्रेम केले. दहा वर्षांनंतर बाबांच्या कामातील एकटेपणा कमी झाला. त्यांचे कार्य पाहण्यासाठी लोक येऊ लागले. याच काळात पु. ल. देशपांडे, कुमार गंधर्व, कुसुमाग्रज यांसारखे दिग्गजही येथे येत असत. बाबांचे हे कार्य आम्ही पाहत असतानाच आमच्यावर नकळत हे संस्कार झाले. आम्ही पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले, पुढे विकास आणि मी दोघेही डॉक्टर झालो. आम्ही आनंदवनाबरोबरच जवळच्या परिसरातील हेमलकसा भागातील आदिवासी जनतेसाठी कार्य सुरू केले. कोणतेही काम हाती घेत असताना अनंत अडचणी येतात. मात्र आपला हेतू आणि उद्देश चांगला असेल तर त्याची चांगली फळे मिळतात हे आम्ही आजवरच्या आयुष्यातून शिकलो. कोणत्याही प्रकल्पासाठी आम्ही कधीही पैसे मागितले नाहीत. आमचे काम पाहून समाजाने या कार्यास मदत केली. पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम उभी राहते याचा अनुभव घेत आहोत. समाजातील शेवटच्या घटकाची जोपर्यंत उन्नती होत नाही, तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकत नाही. सामाजिक कार्य करताना लोक काय म्हणतील असा प्रश्न आपल्याला पडतो. परंतु, जगाकडे पाठ फिरवा म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभे राहिले, असे डॉ. आमटे म्हणाले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, भारत देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे आमटे कुटुंब आहे. त्यांनी आपल्या समाज कार्यातून देशापुढे मोठा आदर्श घालून दिला आहे. आमटे कुटुंबाने दाखविलेल्या मार्गावर चालल्यास आयुष्य तणावविरहित राहील. उन्नती फाऊंडेशनच्या वतीने दर महिन्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण तसेच हरितपट्टा वाढविण्याची आवश्यकता आहे, असे आमदार जगताप म्हणाले.
यावेळी सचिन पवार, रोझलॅण्ड सोसायटीचे संतोष म्हसकर (पर्यावरण), ॲड. गितांजली तडाखे (कायदा), जगन्नाथ काटे (शैक्षणिक), शशिकांत काटे (क्रीडा) यांना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल तसेच गिरीश बोरा, आनंद देशपांडे, वैशाली पाटकर, प्रिया पुजारी आणि ग्रुप यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उन्नती फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कुंदा भिसे यांनी केले. सुत्रसंचालन नाना शिवले यांनी तर आभार विजय भिसे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group