पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची निवड करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. याबाबतची नोंदणी आज पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. योगेश बहल यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ ३६ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शनिवारी (दि.५) पदाचा राजीनामा दिला होता.
बहल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी आज (मंगळवारी) पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ३६ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे. दरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी साने यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिल्यानंतर त्यांची अधिकृत नियुक्ती होईल.
दत्ता साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. भोसरी मतदार संघात येत असलेल्या चिखली परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली असल्याचे, बोलले जात आहे.






















Join Our Whatsapp Group