पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहर परिसरातील ३९ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. दरम्यान चिंचवड परिसरात सर्वाधिक ९३.५ मी.मी पावसाची नोंद झाली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये सलग दोन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली होती. सोमवारी शहर परिसरातील विविध भागांमध्ये १३ ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, तर मंगळवारी १६ ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पथकाच्या वतीने रस्त्यात पडलेली झाडे दूर करून वाहतूककोंडी सुरळीत करण्यात आली.
काल सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. त्यामुळे दिवसभर उकाड्याने पिंपरी-चिंचवडवासीय हैराण झाले होते. दुपारी तीन-साडेतीन वाजेपासून आकाशात काळे ढग भरून आले आणि तासाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींना सुरुवात झाली. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण, तळतळे, काळेवाडी, नेहरूनगर, वल्लभनगर, नाशिक फाटासह परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी जाताना, तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच नागरिकांकडून माहिती मिळाल्याबरोबर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य हाती घेऊन वाहतुकीसाठी रस्ते मोकळे केले.



















Join Our Whatsapp Group