पिंपरी (Pclive7.com):- शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल वेबसाईटवरुन महिलेशी ओळख काढून तिला लग्नाचे अमिष दाखवण्यात आले. त्यानंतर या महिलेची तब्बल ३ कोटी १६ लाख रुपयाची आर्थिक फसवणुक करण्यात आली. हा प्रकार दि.१०/०७/२०२३ ते दि.०९/०९/२०२४ या कालावधीत घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पिंपरी चिंचवड पोलिसांत धाव घेतली . त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने सर्व तांत्रिक माहिती घेत दिल्ली-हरियाणा बॉर्डर येथून तीन आरोपींना अटक केली आहे.

रणजीत मुन्नालाल यादव (वय २७ वर्षे रा. सुकरा बाजार, मंडी गांव, पोस्ट जोनापुर दिल्ली), सिकंदर मुन्ना खान (वय २१ वर्षे, पत्ता सुकरा बाजार, मंडी गांव, पोस्ट जोनापुर दिल्ली), बबलु रघुवीर यादव (वय २५ वर्षे पता-२६१, सुकरा बाजार मंडी गांव, पोस्ट जॉनपुर, दक्षिण दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे विभागाचे पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेशी शादी डॉट कॉम या मेट्रोमोनियल वेबसाईटवरुन ओळख करुन, लग्नाचे आमिष दाखवुन विश्वास संपादन केला होता. आरोपीने तो Duckpro Mining LLC 10488 20th St, Anchorage, AK 99506 कंपनीमध्ये CEO/Managing Director असलेबाबत सांगितले होते. तसेच त्याने त्याच्या गोल्ड माइनिंग बिजनेसच्या प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम आला असुन त्याला आता नविन बिझनेस रॉ मटेरियल करीता फिर्यादी महिलेकडून पैशाची मागणी केली होती. त्यानंतर महिलेने त्याला बिजनेसच्या रॉ मटेरियल करीता पैसे दिले होते. त्यानंतर आरोपी यांने फिर्यादी यांना दुबई येथे FXE CAPITALS BANK खाते रेग्युलराईज करणेसाठी, त्याचे आजारपणाचे उपचारासाठी, त्याने लोकांकडुन घेतलेले कर्ज फेडण्याकरीता, कस्टम क्लिअरंसची रक्कम, दुबई ते दिल्ली या प्रवासाचा एकुण खर्च, प्रतिनिधी म्हणुन काम केल्याचे पैसे त्याच्या व्हेनेझुएला ते दुबई प्रवासाचा खर्च, त्याला टर्की-इस्तांबुल एअरपोर्ट येथे डिटेन केल्यानंतर रिलीज करण्यासाठी पैसे अशी वेगवेगळी कारणे सांगुन महिलेकडून दि.१०/०७/२०२३ ते दि.०९/०९/२०२४ या कालावधी दरम्यान तब्बल ३ कोटी १६ लाख ७८ हजार ११३ रुपये विविध बँक खात्यावर स्वीकारुन ते परत न करता महिलेची आर्थिक फसवणुक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी व पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांचे या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथक तयार केले. या गुन्ह्यातील ३ कोटी १६ लाख ७८ हजार ११३ रुपये ही रक्कम वेगवेगळ्या बँकेच्या ८१ अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. आरोपीने ८१ बँक अकाऊंटला पैसे घेऊन पुढे ३०० ते ४०० बँक अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले होते. सायबर पोलीसांनी एकुण ४००-५०० बँक अकाऊंटची पडताळणी केली असता यातील जास्तीत जास्त अकाऊंट हे दिल्ली येथील असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण व पथक दिल्ली येथे आरोपीचा शोध घेणेकरीता गेले होते. दिल्ली येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपीने वेगवेगळ्या बँकमध्ये एकुण ११ बँक अकाऊंट एकाच पत्त्यावर काढले होते. तसेच सदरचे पत्त्यावर नमुद आरोपी ०२ वर्षापुर्वी भाडेतत्त्वावर राहत होते. तसेच आरोपीने त्याचे मोबाईल नंबर बदलले होते. नमुद बँक अंकाउटवरील व्यवहारांना तब्बल २ वर्षाचा कालावधी झाला असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड झाले होते. परंतु पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी सिकंदर मुन्ना खान याला दिल्ली हरियाणा बॉर्डरवरील मांडी व्हिलेज, दक्षिण दिल्ली याठिकाणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर महिलेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बँक अंकाउट उघडण्यास मदत केलेले सख्खे भाउ रणजीत मुन्नालाल यादव व बबलु रघुवीर यादव यांना देखील याच गावामधुन ताब्यात घेण्यात आले.

हे आरोपी पोलीसांपासुन लपण्यासाठी इंन्स्टाग्राम कॉलचा वापर करत होते. या गुन्ह्यातील आरोपींने बैंक अंकाउट उघडण्यासाठी तात्पुरता भाडेकरार केला होता. त्याआधारे विविध बँकेमध्ये खाती उघडली होती. आरोपी बबलु यादव हा सिकंदर खान याच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या एटीएम मधुन पैसे काढून देत होता. तसेच आरोपी रणजीत मुन्नालाल यादव याने त्याच्या पंजाब नॅशनल बँक अकाऊंटवर ३६ लाख ९६ हजार ६७२ रुपये घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना दिल्ली हरियाणा बॉर्डर येथून अटक करण्यात आली असुन दाखल गुन्ह्याचा अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, दिपक माने, कृष्णा गवळी, अभिजीत उकिरडे, संतोष सपकाळ, दिपक भोसले, नितेश बिचेवार, श्रिकांत कबुले, अतुल लोखंडे, माधव आरुटे, ज्योती साळे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन संपर्क साधणा-या व्यक्ती परदेशी नागरीक असल्यास समक्ष भेटुन, पुर्ण चौकशी करुन त्यांचेशी आपले वैयक्तिक माहिती शेअर करावी. तसेच मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन संपर्क करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर सदर व्यक्तीबाबत सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे तक्रार नोंद करावी.– डॉ. शिवाजी पवारपोलीस उप-आयुक्त, गुन्हे. पिंपरी चिंचवड