राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडून आमदार लांडगेंचा सडकून समाचार
पिंपरी (Pclive7.com):- “तुमचा वस्ताद अजितदादा आहे अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट घालायला शिकवलं.. तेंव्हा कुठं तुम्ही पैलवान झाले हे विसरु नका..! अन् वस्ताद शेवटी एक डाव राखून ठेवतो”, असा इशारा देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी काल केलेल्या वक्तव्याचा सडकून समाचार घेतला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय आखाडा रंगला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीचं महायुतीत तेढ निर्माण होणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं आमदार पैलवान महेश लांडगेंनी थेट अंगावर घेण्याची भाषा वापरत, अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांना कुस्तीचं आव्हान दिलं होतं.
अजित पवारांच्या विरोधात आमदार महेश लांडगे यांनी दंड थोपटल्यानंतर त्याचे पडतात प्रदेश स्तरावर उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत महेश लांडगे यांनी काल केलेल्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, “तुमचा वस्ताद अजितदादा आहे. आणि त्यांनीचं तुम्हाला लंगोट घालायला शिकवलं, तेंव्हा कुठं तुम्ही पैलवान झाले हे विसरु नका..! अन् वस्ताद शेवटी एक डाव राखून ठेवत असतो असा इशारा ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे.
अजित पवारांनी मंगळवारी भोसरीत येऊन पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं. त्यांनतर दुसऱ्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांसमोर महेश लांडगेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकले. मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही, मला अंगावर घेण्याची सवय आहे. अशी आक्रमक भाषा वापरली. मग मुख्यमंत्र्यांनी ये पब्लिक है, ये सब जाणती है असं म्हणत लांडगेंना सबुरीचा सल्ला दिला.

आता अजितदादांच्या मल्लांनी महेश लांडगे यांच्या विरोधात आखाड्यात उडी घेत, तुमचा वस्ताद कोण? तुम्ही कोणामुळं पैलवान झाले? तुम्हाला लंगोट घालायला कुणी शिकवलं हे न विसरण्याचा सल्ला दिला. तसेच वस्ताद शेवटी एक डाव राखून ठेवतो, असा इशाराही उमेश पाटील यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group