पिंपरी (Pclive7.com):- विशाल नगर DP रोड परिसरातील विविध सोसायट्यांचे रहिवासी एकत्र येत, “विशाल नगर – पिंपळे निलख रहिवासी मंच” या नव्या मंचाची स्थापना (दि.०६) रोजी करण्यात आली आहे. या मंचाचा उद्देश म्हणजे परिसरातील वाहतूक अडचणी, पादचारी मार्गावरील अतिक्रमण, सार्वजनिक सुरक्षेच्या समस्या आणि नागरी सुविधांवरील तक्रारी यावर सामूहिक व समन्वयित कृतीद्वारे उपाय शोधणे हा आहे.

हा मंच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, स्थानिक प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून कार्य करणार आहे. “आपला परिसर ही आपलीच जबाबदारी” या भावनेतून प्रेरित होऊन, रहिवाशांनी एकत्र येऊन नागरी प्रश्नांसाठी एकसंध आवाज निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. या मंचाच्या माध्यमातून प्रशासनावर सकारात्मक दबाव निर्माण करून, परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमात वॉटर एज, शुभेच्छा रेसिडेन्सी, ओव्हल स्प्रिंग, २४K ग्लिटराटी, यशदा एपिक, NSG रॉयल, २४K ओपुला, श्रीराम, नंदनवन, निसर्ग आकाश आणि नेको स्काय पार्क या सोसायट्यांचे प्रतिनिधी सक्रिय सहभागी झाले आहेत.
या परिसरातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, जेणेकरून योग्य त्या मागण्यांसाठी एकत्रित आणि ठोस प्रशासनिक दबाव निर्माण करता येईल, असे आवाहन या मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group