दापोडी (Pclive7.com):- दापोडी येथील गणेश इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणांद्वारे पंढरपूर वारीच्या परंपरेचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल नामाच्या जयघोषाने झाली. नंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य, अभंगगायन, संतांचे संवाद, रिंगणातील पारंपरिक खेळ यांचे सुंदर सादरीकरण केले. या सादरीकरणातून त्यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि अध्यात्मिक मूल्ये प्रभावीपणे साकारली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा पवार यांनी केले. मुख्याध्यापिका सौं. विजया लेंभे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व पटवून दिले. तसेच सहयोगी संचालक श्री. सुनील शेवाळे यांनी ‘वारी का साजरी करतात’ याचे सखोल आणि प्रेरणादायी विवेचन केले. या कार्यक्रमाला श्री. सतीश शेळके आणि श्री. प्रकाश गायकवाड यांची खास उपस्थिती लाभली होती. त्यांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद आणि पालक यांचीही उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव रुजवली जाते, हे विशेष. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ. सायली बडगुजर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group