पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकर आणि मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू आहे. धरण आज (दि.२५) सायंकाळी ७.३० वाजता ८४.८७ टक्के एवढे भरले असून रात्री ८ वाजता धरणातून ४४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ८४.८७ टक्के एवढे भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये सांडव्यावरून १५०० क्युसेक्स, तर जलविद्युत केंद्रातून १००० क्युसेक्स असा एकूण २५०० क्युसेक्स विसर्ग चालू आहे.

तरी, आज रात्री ८ वाजता सांडव्यावरील विसर्ग वाढवून ३००० क्युसेक्स तर जलविद्युत केंद्रामधील विसर्ग वाढवून १४०० क्युसेक्स करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने पवना नदीपात्रामध्ये एकूण विसर्ग ४४०० क्युसेक्स इतका राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत.

सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group