पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निगडी बस स्टॉपजवळील महाराणा प्रताप पुतळा परिसरात मेट्रो कामासाठी लावलेला लोखंडी पत्रा अचानक रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्या वेळी वर्दळ कमी असल्यामुळे कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे ठेकेदारांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

याआधीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर टिळक चौकात अशीच घटना घडली होती. त्यावेळी लोखंडी पत्रा अंगावर पडून नंदिनी तरळ या महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आज पुन्हा अशीच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.

या घटनांमुळे मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदारांची कार्यपद्धती आणि सुरक्षेची सुनिश्चिती या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली असून, भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी मेट्रो साइटवरील सुरक्षाव्यवस्था अधिक भक्कम करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.






















Join Our Whatsapp Group