

पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी हब येथील फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित आयटी कंपनीतील गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्सची चोरी करून तब्बल ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कंपनीच्या तीन माजी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ही घटना एप्रिल २०२४ पासून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर काळे (४५, रा. थेरगाव) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांच्या कंपनीत आरोपी वरिष्ठ पदांवर काम करत होते. त्यांना कंपनीच्या प्रकल्पांशी संबंधित गोपनीय माहिती, कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड व अत्याधुनिक सॉफ्टवेअर सोल्युशन्सची माहिती होती. मात्र कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग करून त्यांनी संगनमताने ही माहिती चोरली.

चोरी केलेल्या सोल्युशन्सचा वापर करून त्यांनी स्वतःची नवीन कंपनी स्थापन केली. केवळ एवढेच नाही, तर या कंपनीच्या नावाखाली त्यांनी १०० हून अधिक बेकायदा वेबसाइट्स विकसित करून ग्राहकांना सेवा पुरवल्या. या प्रक्रियेत फिर्यादीच्या कंपनीला मिळणारा मोबदला, भविष्यातील करारातील अपॉर्च्यूनिटी लॉस तसेच इतर तांत्रिक सेवांचा महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला. परिणामी, एकूण नुकसान ८२ कोटी रुपये इतके झाले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक साग पोमण, पोलिस अंमलदार हेमं खरात, अतुल लोखंडे, दीपक भोसले, नितेश बिचेवार, विनायक म्हसकर, सोपान बोधवड, सुभाम पाटील, माधव आरोटे, श्रीकांन कबुले, मुकुंद वारे, अभिजी उकिरडे, निलेश देशमुख, ज्योती साळे, वैशाली बर्गे, शुभांगी ढोबळे दीपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.























Join Our Whatsapp Group