
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड प्रदूषण वाढले आहे. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या शेजारील पुण्यापेक्षा पिंपरीतील प्रदूषणात वाढ झाली आहे. शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असून कोट्यवधी रुपये खर्च करुनही प्रदूषण कमी होत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. तातडीने प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिकेने शहराची विभागणी करुन साफसफाईचे कंत्राट दोन ठेकेदारांना दिले आहे. परंतु, नियमितपणे शहरातील रस्त्यांची साफसफाई होत नाही. रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. साफसफाई करताना वाहनांची धूळ उडत आहे. वाहनांचीच धूळधाण उडताना दिसते. त्यामुळे धुळीने नागरिक त्रस्त आहेत. साफसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डेच-खड्डे आहेत. पावसाळा संपूनही खड्डे बुजविले नाहीत.

शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. परंतु, बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. खडी, वाळू, क्रश सॅंड यांची उघड्या वाहनातून वाहतूक केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीच्या पात्रात राडारोडा टाकला जात आहे. मैलामिश्रित पाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. नदी सुधारवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही नदीची दयनीय अवस्था आहे. प्रशासन केवळ निविदा काढण्यात दंग आहे. वाढत्या प्रदुषणाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. श्वसनाचे विकार जडत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

























Join Our Whatsapp Group