पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १० मधील मुलांना दर्जेदार, परवडणारे व समान शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शासकीय माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी दिली.

प्रभाग क्रमांक १० मध्ये आर्थिक मागासवर्गीय, मध्यमवर्गीय तसेच कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. अनेक भागांमध्ये शासकीय शाळांचा अभाव असल्याने पालकांना खासगी शिक्षणाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. काही कुटुंबांमध्ये तर प्राथमिक शिक्षणाचाही खर्च जड जात असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागण्या आणि विद्यार्थ्यांची होत असलेली शैक्षणिक कुचंबणा लक्षात घेता, महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १० मध्ये शासकीय माध्यमिक व इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे अनुराधाताई गोरखे यांनी स्पष्ट केले. सदर शाळा एक ‘रोल मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्यात येणार असून, वंचित, दुर्बल व गरीब घटकांतील विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.

यावेळी अनुराधाताई गोरखे म्हणाल्या, “एक आदर्श समाज घडवण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
दरम्यान, प्रभागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
























Join Our Whatsapp Group