प्रभाग २७ – रहाटणीमध्ये भाजपच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ
रहाटणी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला असून, या प्रभागातील भाजप व आर. पी.आय. (आठवले गट) युतीचे चारही उमेदवार केवळ निवडूनच येणार नाहीत, तर ते प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी व्यक्त केला आहे.

या प्रभागातून भाजपकडून निवडणूक रिंगणात असलेल्या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे नगरसेवक होते, एक नवीन चेहरा आहे. विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात रहाटणी परिसरात केलेले रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरी सुविधा तसेच मूलभूत विकासाची कामे आज मतदारांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे, मतदार राजा या चारही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप म्हणाले, रहाटणी प्रभाग २७ मधील चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन आणि सविता खुळे या तीनही नगरसेवकांनी त्यांच्या कामातून जनतेचा विश्वास मिळवला आहे, तर अर्चना विनोद तापकीर या नवीन उमेदवारही तितक्याच ताकदीने काम करण्यास सक्षम आहे. प्रभागातील जी काही प्रलंबित विकासकामे आहेत, ती येणाऱ्या काळात हे सर्व उमेदवार निश्चितपणे पूर्ण करतील. त्यामुळे या प्रभागातील चारही उमेदवार केवळ निवडून येणार नाहीत, तर मोठ्या बहुमताने विजयी होतील, याची मला पूर्ण खात्री आहे.

रहाटणी, श्रीनगर, ज्योतिबानगर, तापकीरनगर आदी भागांत भाजपची मजबूत संघटना, अनुभवी नेतृत्व आणि विकासाचा ठोस ट्रॅक रेकॉर्ड, यामुळे वातावरण भाजपच्या बाजूने झुकलेले दिसत असून, प्रचाराच्या शुभारंभाने या विजयाच्या वाटचालीला अधिक गती मिळणार आहे.






















Join Our Whatsapp Group