भाजपकडून “विजयाचा शंखनाद”, प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपाच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे पिंपरीत विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवायची असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे केलेल्या विकास कामाच्या जोरावर पिंपरी प्रभागात भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी व्यक्त केला.

पिंपरीगाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपा–आरपीआयचे अधिकृत उमेदवार उषा वाघेरे, मोनिका निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांच्या प्रचारार्थ निवडणूक कचेरीचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, मंडल अध्यक्ष अनिता वाळुंजकर, बबलू सोनकर, लच्छु बुलाणी, अरूण टाक, मदन गोयल, विशाल वाघेरे, अमर कापसे, ज्योतिका मलकानी, कुणाल साठे, जयेश चौधरी, गिरीश लखवानी, अनिल कारेकर, आशाताई सौदागर, राजू गायकवाड, रवी वाघमारे, अमरजीत यादव, शंकर नाथांनी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार उमा खापरे म्हणाल्या की, या प्रभागातील प्रचाराची जबाबदारी ज्योतिकाताई मलकानी यांनी सक्षमपणे सांभाळावी. प्रभाग क्रमांक २१ मध्ये आतापर्यंत विकासाची गंगा वाहिली असून ती अखंड सुरू ठेवण्यासाठी चारही भाजप उमेदवारांचा विजय आवश्यक आहे. दादागिरी आणि पैशाच्या माजाला भाजप कधीच थारा देणार नाही. अहंकार दाखवणाऱ्यांना जनता घरी बसवेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचाच महापौर होईल आणि पिंपरी प्रभागात चारही ‘कमळे’ फुलतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे यांनी पिंपरी प्रभागात उमेदवारी अर्ज भरूनही पक्षासाठी माघार घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “पक्षासाठी मन मोठे करून प्रामाणिकपणे घेतलेल्या निर्णयाचा सन्मान राखला जाईल. या सर्वांचा पाठिंबा चारही भाजप उमेदवारांच्या विजयातून सार्थ ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

विकासकामांचा उल्लेख करत वाघेरे म्हणाले की, पिंपरी गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, जोग महाराज उद्यान, भैरवनाथ मंदिराचा विकास, अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज जिजामाता रुग्णालय, काळेवाडी ब्रिज तसेच पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर ब्रिज, मिलिटरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल अशी अनेक कामे महापालिकेच्या माध्यमातून, जनतेच्या निधीतून झाली आहेत. या विकासकामांचे श्रेय कोण्या एकाचे नसून त्या-त्या वेळच्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच ही कामे पूर्ण झाली आहेत. पिंपरी गाव वासियांनी आजपर्यंत विकासाला साथ दिली आहे, त्यामुळे भाजपच्या श चारही उमेदवारांना मतदार साथ देतील असा विश्वास संजोग वाघेरे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
यावेळी प्रास्ताविक किशोर उदास यांनी केले तर आभार विशाल वाघेरे यांनी मानले.
























Join Our Whatsapp Group