
“नाद घुमणार, कमळ फुलणार”चा निनाद; प्रभाग २२ मध्ये पदयात्रेला हजारोंची गर्दी
काळेवाडी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २२ (काळेवाडी–विजयनगर) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने अक्षरशः वादळ उठवले असून, भाजपा उमेदवारांच्या भव्य पदयात्रेतून विजयाचा स्पष्ट एल्गार करण्यात आला. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली ही पदयात्रा म्हणजे शक्तीप्रदर्शन ठरली. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. नीताताई पाडाळे, सौ. कोमलताई काळे, श्री. विनोद नढे आणि ॲड. हर्षद नढे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी–रहाटणी परिसरात सायंकाळी काढलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महिला, लाडक्या बहिणी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

“नाद घुमणार, कमळ फुलणार”, “भाजपच येणार” अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. दहा हजारांहून अधिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीने मतदार राजा भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश या पदयात्रेतून गेला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष यांची भक्कम फळी उपस्थित होती. ही गर्दी केवळ रॅलीपुरती मर्यादित न राहता आगामी निवडणुकीत निर्णायक मतांमध्ये परिवर्तित होणार असल्याचा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी ही केवळ घोषणा करणारी नव्हे तर काम करून दाखवणारी पार्टी आहे. २०१७ पासून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या मूलभूत सुविधांवर ठोस विकासकामे करण्यात आली आहेत. आगामी काळात या विकासाचा वेग अधिक वाढवून प्रभाग २२ ला विकासाचा आदर्श प्रभाग बनवण्याचा निर्धार उमेदवारांनी केला. विकासाचे व्हिजन, मजबूत नेतृत्व आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपाचा विजय अटळ असल्याचा ठाम विश्वास या पदयात्रेतून व्यक्त झाला.
























Join Our Whatsapp Group