वाकड–ताथवडे–पुनावळेत नागरिकांच्या प्रश्नांना थेट भिडणारा संवाद
वाकड (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २५ (क) मधील वाकड, ताथवडे व पुनावळे परिसरात सौ. श्रुती राम वाकडकर यांनी गेल्या काही दिवसांत केलेला सोसायटीधारकांशी थेट संवादाचा झंझावाती दौरा नागरिकांच्या मनाला भावून गेला आहे. कोणतीही औपचारिकता न ठेवता, थेट घराघरांत जाऊन समस्या ऐकून घेणारी, नोट्स काढणारी आणि उपायांची ठोस दिशा देणारी ही भेट नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.

या गाठी-भेटींमध्ये श्रुती वाकडकर यांनी मोठे व्यासपीठ न निवडता सोसायटी परिसर, पार्किंग, गार्डन आणि प्रवेशद्वार हेच आपले संवादस्थळ केले. त्यामुळे हा दौरा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडला आहे. सोसायटीधारकांनी पाणीटंचाई, पार्किंगचा प्रश्न, वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, सुरक्षेचे प्रश्न तसेच मुलांसाठी प्ले ग्राउंड व ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र यासारख्या अनेक समस्या मांडल्या. यावेळी श्रुती वाकडकर यांनी प्रत्येक प्रश्न शांतपणे ऐकून घेत “फक्त आश्वासन नाही, तर नियोजनासह उपाय” याबाबत भूमिका स्पष्ट केली.

विशेषतः N.H. 4 ग्रेड सेपरेटर, पी.सी.एम.सी. हॉस्पिटल, सिटी बस डेपो, ऑक्सिजन पार्क, सार्वजनिक वाचनालय आणि शाश्वत पाणी व्यवस्था या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर माहिती देत, या प्रकल्पांचा नागरिकांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम समजावून सांगितला. “विकास म्हणजे फक्त इमारती नाहीत, तर सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुसंस्कृत जीवन,” असे त्या प्रत्येक भेटीत ठामपणे सांगत होत्या.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला हृदयस्पर्शी संवाद. अनेक महिलांनी सुरक्षितता, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत चिंता व्यक्त केली असता, “तुमची भीती आणि प्रश्न माझेच आहेत,” असे सांगत श्रुती वाकडकर यांनी भावनिक शब्दांत विश्वास दिला. काही ज्येष्ठ नागरिकांनी तर “नेते घरात येऊन प्रश्न विचारतात, हे पहिल्यांदाच पाहतोय,” अशा प्रतिक्रिया दिल्या.

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राम हनुमंत वाकडकर यांच्या नियोजनातून प्रभागाचा सुस्पष्ट विकास आराखडा तयार असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले. “हा आराखडा फाईलमध्ये न राहता जमिनीवर उतरवण्याची जबाबदारी माझी आहे,” असे ठाम शब्द त्यांनी उच्चारले. या झंझावाती दौऱ्यामुळे प्रभाग २५ (क) मध्ये नवे, संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्व उभे राहत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गाठी-भेटी संपल्यानंतरही अनेक सोसायट्यांमध्ये श्रुती वाकडकर यांच्या साधेपणा, आपुलकी आणि स्पष्ट भूमिकेची चर्चा रंगताना दिसत आहे. एकंदरीत, हा दौरा म्हणजे केवळ राजकीय भेटींची मालिका नसून विश्वास निर्माण करणारा, आशा जागवणारा आणि विकासाची दिशा दाखवणारा लोकसंवाद ठरल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
























Join Our Whatsapp Group