मराठमोळ्या दिग्दर्शकाची पंचवीस वर्षाची तपश्चर्या…!
पिंपरी (Pclive7.com):- एकही संवाद नसलेला तरीही जराही कंटाळवाणा नसलेला सिनेमा… प्रवाही कथा, बंदिस्त पटकथा, वेगवान कथानक, श्रवणीय-प्रेक्षणीय गाणी, परफेक्ट कास्टींग, अचूक लोकेशन्स…यामुळे सर्वार्थाने उत्तम झालेला सिनेमा… साऊथचे सुपरस्टार विजय सेथूपथी, अरविंद स्वामी यांसारखे तगडे कलाकार असलेला हा ‘पॅन इंडिया’ सिनेमा.

महेश मांजरेकर, सिध्दार्थ जाधव, गोविंद नामदेव, रोहिणी हट्टंगडी, जयवंत वाडकर, अनंत जोग, उषा नाडकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात असे दमदार मराठी चेहरे असलेला सिनेमा.. गजबजलेल्या मुंबईत शांतपणे ‘गांधी टॉक्स’ची कथा पुढे सरकते. सिनेमात पात्रांची मराठी नावे आहेत. संपूर्ण सिनेमात मराठीमय वातावरण आहे.
भ्रष्टाचारामुळे सडलेली शासकीय यंत्रणा, गरीबी-श्रीमंतीतील दरी, पैशांची हाव, दारित्र्य, लाचारी इथपासून ते प्रतिकूल परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा..यावर सिनेमातून परखड भाष्य केले जाते. विशेष म्हणजे कोणत्याही संवादाशिवाय सिनेमातील सारी दृश्ये व त्यातील आशय मनाला भिडतो.
सिनेमाला गांधींजींचे सूचक असे नाव का दिले, ते संपूर्ण सिनेमा पाहताना जाणवत राहते. राष्ट्रपुरूषांच्या पुढ्यात विजय सेथूपथी उभा राहतो, तो शेवटचा सीन सर्वोत्तम झालाय. त्यातून द्यायचा तो संदेश प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचतो. लेखक दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी २००० सालापासून ‘गांधी टॉक्स’ सिनेमासाठी काम सुरू केले. इतकी वर्षे त्यांनी पाठपुरावा केला. अनेक नकार पचवले. वेळप्रसंगी अपमान सहन केला. मात्र, प्रयत्नांमधील सातत्य सोडले नाही. कदाचित त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या.
विजय सेथूपथी, ए. आर. रेहमान यांनी केवळ कथा ऐकून होकार दिला. इतर ताकतीचे कलाकार व चांगले निर्माते जोडले गेले. ‘झी स्टुडिओ’ सारखी भक्कम प्रॉडक्शन हाऊस कंपनी पाठिशी उभी राहिली. यातूनच आगळ्या वेगळ्या ठरणाऱ्या धाडसी सिनेमाची निर्मिती होऊ शकली. यापूर्वी ‘पुष्पक’ (१९८७) सिनेमाद्वारे ‘सायलेंट मुव्ही’चा प्रयोग करण्यात आला होता. ज्यात कमल हसन आणि आमला यांनी कमालीचा अभिनय केला होता. त्याची आठवण आजही केली जाते. त्यानंतर, तब्बल ३९ वर्षानंतर किशोर बेळेकरांच्या माध्यमातून ‘गांधी टॉक्स’च्या रूपाने हे धाडस नव्याने करण्यात आले आहे.

अरविंद स्वामी यांनी दिवाळखोरीत निघालेला बिझनेसमन तर विजय सेथूपथी यांनी सर्वसामान्य कुटुंबातील बेरोजगार तरूण अक्षरश: जीवंत केला आहे. त्या दोघांच्या अभिनयाला तोड नाही. सिध्दूने धुमाकूळ घातला आहे. छोट्या-छोट्या प्रसंगाद्वारे सिध्दूने रंगत आणली आहे. पडद्यावरील सिध्दूचा वावर साऊथचा ‘कॉमेडी किंग’ योगी बाबूची आठवण करून देतो. महेश मांजरेकर यांनी राजकीय नेत्याची छोटीशीच परंतू लक्षवेधी भूमिका साकारली आहे. संपूर्ण चित्रपटात ए, आर. रेहमान यांच्या संगीताची जादू दिसून येते.
विशेषतः ‘bgm’ (पार्श्वसंगीत) चे कौतुक करावे तितके कमीच आहे. प्रत्येक फ्रेम कमालीची झाली आहे. विजय सेथूपथी आणि अदिती यांच्या हळूवार प्रेमकथेचा ट्रॅक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. त्यांच्यावर चित्रीत झालेले ‘जरा जरा हैराण मै हुई…’ हे गाणे यापूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. पडद्यावर ते गाणे पाहताना ‘कयामत से कयामत तक’मधील ‘ए मेरे हमसफर…’ किंवा ‘जो जिता वही सिकंदर’मधील ‘पहला नशा…’ ‘रोजा’मधील ‘दिल है छोटासा, छोटीसी आशा’….अशाप्रकारच्या गाण्यांचा फील येतो.
‘ही जवानी कच्ची, ही कहानी सच्ची’…हे कॅसिनोमधील एक गाणे आहे, ज्यात विजय सेथुपथी, अरविंद स्वामी आणि सिध्दू यांचा एकत्रित डान्स आहे. तो अफलातून झाला आहे. ‘ही सोनेरी किरणे’..हे गाणे श्रवणीय आहे. पडद्यावर ते अरविंद स्वामी यांचा कथेतील प्रवास दर्शविते. जवळपास २ तास १३ मिनिटांचा हा संवादविरहीत सिनेमा म्हणजे अत्यंत धाडसी प्रयोग होता. तो निश्चितपणे यशस्वी झाला, असे आपण खात्रीने म्हणू शकतो.
मोबाईल आणि सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या सध्याच्या पिढीला थिएटरमध्ये दोन तास खिळवून ठेवणे हे अतिशय अवघड काम सहजरित्या करतानाच एक परिपूर्ण सिनेमा पाहिल्याचे समाधान ‘गांधी टॉक्स’ नक्कीच देतो. खऱ्या सिनेमाप्रेमींना हा सिनेमा आवडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुणा तो पुन्हा-पुन्हा पहावा असा नक्कीच झाला आहे… ‘झी स्टुडिओ’, उमेश बन्सल, राजेश केजरीवाल, मीरा चोपडा, गुरूपाल सचर, किशोर बेळेकर….यांसह सर्व टीमचे यासाठी अभिनंदन करायलाच हवे.






















Join Our Whatsapp Group